नगरपरिषदेकडून युद्धपातळीवर कामे सुरू
धीरज सेतवाल नशिराबाद प्रतिनिधी
सततच्या पावसामुळे आणि शहरात सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामांमुळे नशिराबादकरांना गेल्या काही दिवसांपासून चिखलमय रस्त्यांच्या त्रासाचा सामना करावा लागत होता. मात्र, पावसाने उसंत घेताच नशिराबाद नगरपरिषदेने नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेत रस्ता दुरुस्तीची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे.
शहरातील न्यू इंग्लिश स्कूल परिसर, दत्त मंदिराशेजारील गल्ली, द्वारका नगर (सुपर शॉपच्या मागील भाग) आणि अण्णांच्या गार्डनजवळील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांची मोठी ओढाताण होत होती. ही समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेच्या पथकाने तातडीने यंत्रसामग्रीच्या सहाय्याने या भागातील रस्ते समतल करून त्यावर मुरुम टाकण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांना मोठा दिलासा
नगरपरिषदेच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रस्ते दुरुस्तीमुळे वाहतुकीतील अडथळे दूर होऊन शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. तसेच पावसाने उघडल्यामुळे सुरू झालेल्या या कामांमुळे दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, शहरातील इतर ज्या भागांतील रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत, त्या रस्त्यांचीही लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने या मागणीचीही दखल घेऊन उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
