‘दोन जन्मात अंतर, कुटुंब सदृढ निरंतर’चा संदेश; भडगाव तालुका आरोग्य विभागाचा उपक्रम
भडगाव | प्रतिनिधी – गणेश रावळ
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त भडगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. के. अजने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन संबंधितांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रसूती सेवा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, तांबी (IUCD), PPICUD, अंतरा आदी कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. समाधान वाघ यांचा सर्जन म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी बी. के. अजने यांनी माता व बाल आरोग्य क्षेत्रात आरोग्य विभागाने ग्रामीण भागात केलेल्या कार्याचे कौतुक केले. केंद्र स्तरावर मोठ्या प्रमाणात सुरक्षित प्रसूती होत असून, त्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनाचे “दोन जन्मात अंतर, कुटुंब सदृढ निरंतर” हे घोषवाक्य स्पष्ट करत कुटुंब नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. योग्य वयात विवाह, नियोजित गर्भधारणा आणि कुटुंब नियोजनाचा स्वीकार ही काळाची गरज असून, सुदृढ आई, निरोगी बालक आणि आनंदी कुटुंबासाठी प्रत्येकाने लोकसंख्या नियंत्रणाबाबत जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
जागतिक लोकसंख्या दिन हा कुटुंब नियोजन, प्रजनन आरोग्य आणि जबाबदार पालकत्वाबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगत ही माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ. प्रतीक भोसले (पिंपरखेड), डॉ. नितीन सोनवणे (गुढे) यांच्यासह भडगाव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका आरोग्य सहाय्यक दगडू शिरसाठ, जयराम महाजन आणि अजय अलई यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. समाधान वाघ यांनी केली, सूत्रसंचालन श्रीकांत मराठे (आरोग्य सहाय्यक, कजगाव) यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय सोनार कळवाडीकर (आरोग्य निरीक्षक, पिंपरखेड) यांनी केले.
