शिरपूर तालुक्यातील रिच्यापाडा येथील घटना • दोन्ही राज्यांतील नागरिकांचा संपर्क विस्कळीत • ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
शिरपूर | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रिच्यापाडा येथे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी लाखो रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेला हा पूल कोसळल्याने दोन्ही राज्यांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि शिरपूर पंचायत समिती बांधकाम विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसाच्या पहिल्याच फटक्यात पूल वाहून गेल्याने शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या कामाच्या दर्जावर संशय व्यक्त केला जात आहे.
या पुलामुळे शिरपूर तालुक्यातील रिच्यापाडा, पळासनेरसह महाराष्ट्रातील गावांचा तसेच मध्यप्रदेशातील आंबापाणी व परिसरातील गावांचा संपर्क सुलभ झाला होता. पूल वाहून गेल्याने नागरिकांना पुन्हा पर्यायी आणि धोकादायक मार्गांचा वापर करावा लागत असून दैनंदिन वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुलावरच ठिय्या आंदोलन करत संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. बांधकामादरम्यान गुणवत्तेची तपासणी झाली होती का, कामावर देखरेख कोणी केली, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का, असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर पूर्वी पूल नसल्याने पावसाळ्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे नवीन पूल उभारण्यात आला होता. मात्र, अवघ्या महिनाभरातच तो वाहून गेल्याने नागरिकांचा शासनाच्या विकासकामांवरील विश्वास डळमळीत झाला आहे. दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि दर्जेदार पद्धतीने नव्याने पूल उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
