तांत्रिक मान्यता, अतिरिक्त वीज भार व खर्चाची माहिती न मिळाल्याचा दावा • अपील प्राधिकरणाकडे संपूर्ण माहितीची मागणी
संघरत्न सपकाळ भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ नगरपालिकेच्या कार्यालयातील विविध दालनांमध्ये बसविण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रणा (एसी) संदर्भातील माहितीवरून माहिती अधिकार (RTI) अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत दाखल केलेल्या अर्जाला अपूर्ण व अपुरी माहिती देण्यात आल्याचा दावा अर्जदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी केला असून, त्यांनी याप्रकरणी प्रथम अपील दाखल केले आहे.
अर्जदारांनी नगरपालिकेकडे एसी बसविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मान्यता, झालेला खर्च, संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन स्तर, मागील दोन वर्षांचे वीज बिल तसेच एसीमुळे वाढलेल्या अतिरिक्त विद्युत भाराची (Electrical Load) माहिती मागितली होती.
नगरपालिकेकडून प्राप्त उत्तरात काही वीज बिलांची माहिती देण्यात आली. मात्र, एसीमुळे वीज भारात किती वाढ झाली, यासंदर्भातील तपशील उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचा अर्जदारांचा दावा आहे. तसेच Electrical PWD ची तांत्रिक मान्यता, विशेष परवानगी आणि इतर संबंधित कागदपत्रांबाबत “माहिती उपलब्ध नाही” असे उत्तर देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या उत्तरावर असमाधान व्यक्त करत ९ जुलै २०२६ रोजी माहिती अधिकार कायद्यानुसार प्रथम अपील दाखल करण्यात आले आहे. अपील प्राधिकरणाकडे संपूर्ण, प्रमाणित आणि कायद्यानुसार अपेक्षित माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी अर्जदारांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रथम अपील प्राधिकरण काय निर्णय घेते, तसेच नगरपालिकेला संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
