रेशन दुकान फोडून गव्हाचे १० कट्टे चोरले; दोन दुचाकींसह चोरीचा ऐवज हस्तगत, न्यायालयाने दिली पोलीस कोठडी
साक्री/पिंपळनेर | प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील कुडाशी परिसरातील रेशन दुकानात घरफोडी करून गव्हाचे १० कट्टे चोरून नेणाऱ्या चार आरोपींना पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपींकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकींसह एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जलद कारवाईमुळे पिंपळनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी पहाटे २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी पंढरीनाथ बारकू पवार यांच्या महुबंद (पोस्ट कुडाशी, ता. साक्री) येथील शासकीय रेशन दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील ५० हजार रुपये किमतीचे ५० किलो वजनाचे गव्हाचे १० कट्टे चोरून नेण्यात आले.
याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७३/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली.
तपासादरम्यान पोलिसांनी पोबारे (पोस्ट कुडाशी, ता. साक्री) येथून प्रदीप छोटीराम गांगुर्डे (२५), गुलाब गोकुळ शिंदे (३१), योगेश यशमल बहिरम (२४) आणि मंगेश गुलाब सावळे (२६) या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला.
आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीचे गव्हाचे १० कट्टे, ७० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आणि ५० हजार रुपये किमतीची हिरो आयस्मार्ट मोटारसायकल असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावत चारही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत प्रभारी अधिकारी नामदेव सहारे यांच्यासह पोलीस अंमलदार अशोक पवार, कांतीलाल अहिरे, विश्वास हजारे, योगेश महाले, संदीप पावरा आणि पंकज वाघ यांनी सक्रिय सहभाग घेतला.
