तपासातील विसंगतीवरून वाढला संशय • मुलीकडून ९०.३० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त • खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड
धुळे | सुनील निकम | प्रतिनिधी
धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाल्याची तक्रार देणारी फिर्यादीच या गुन्ह्याची आरोपी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पश्चिम देवपूर पोलिसांनी घरफोडीचा बनाव उघडकीस आणत फिर्यादी महिलेकडून ५ लाख ६० हजार रुपये किमतीचे ९०.३० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२६ रोजी सुंदरनगर, वलवाडी (देवपूर) येथील घरातून अज्ञात चोरट्याने कस्तुरीबाई यांच्या मालकीचे सोन्याचे मंगळसूत्र, छोटी सोन्याची माळ, दोन सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची पोत असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार सोनल भास्कर बागले (वय ५८) यांनी दिली होती.
या तक्रारीवरून १० मार्च २०२६ रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(१) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जिभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि फिर्यादीच्या कथनातील विसंगती पोलिसांच्या निदर्शनास आली. चौकशीदरम्यान फिर्यादीने वारंवार बदलणारे जबाब दिल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
अखेर १० जुलै २०२६ रोजी करण्यात आलेल्या सखोल चौकशीत सोनल बागले यांनी घरफोडीचा बनाव रचल्याची कबुली दिली. त्यांनीच आपल्या आईचे ९०.३० ग्रॅम वजनाचे, ५ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून खोटी फिर्याद दिल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर सर्व दागिने पोलिसांनी जप्त केले.
तपासात प्रत्यक्षात कोणतीही घरफोडी झाली नसून, खोटी तक्रार दाखल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत प्रभारी अधिकारी जिभाऊ पाटील, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर तसेच मनोज पाटील, मनोज साठे, मनोहर पिंपळे, किरणकुमार साळवे, सनी सरदार, सुनील राठोड, अविनाश सादरे आणि भाग्यश्री सोनवणे यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, खोटी तक्रार देऊन कायद्याची दिशाभूल करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
