सोने-चांदीचे दागिने, ट्रॅक्टर, मोबाईल, रोख रक्कम व दुचाकींचा समावेश • उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस पाटलांचा गौरव
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘मुद्देमाल सुपूर्दगी’ मोहिमेअंतर्गत शनिवारी (११ जुलै) जळगाव येथील पद्मालय हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात अमळनेर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांकडून ३४ लाख ८ हजार ४१५ रुपये किमतीचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते उपस्थित होते.
अमळनेर पोलीस ठाण्याकडून २०.६७ लाखांचा मुद्देमाल परत
अमळनेर पोलीस ठाण्यातील विविध चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ७० ग्रॅम सोन्याचे दागिने (१०.४६ लाख रुपये), ७.०३ लाखांची रोख रक्कम आणि २६ मोबाईल फोन (३.१८ लाख रुपये) असा एकूण २० लाख ६७ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल संबंधित मालकांना परत करण्यात आला.
पारोळा पोलीस ठाण्याकडून धार्मिक स्थळातील चोरीचा मुद्देमाल
पारोळा पोलीस ठाण्याने मारुती मंदिरातून चोरीस गेलेला ५०० ग्रॅम चांदीचा मुकुट, १५० ग्रॅम चांदीच्या मासळ्या आणि १४ मोबाईल फोन असा एकूण ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात दिला.
एरंडोल पोलीस ठाण्याकडून ट्रॅक्टर व मोबाईल सुपूर्द
एरंडोल पोलीस ठाण्याने विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेले स्वराज ७४४ एक्सटी, न्यू हॉलंड ३२३० आणि सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल परत केला.
मारवड पोलीस ठाण्याकडून दुचाकी परत
मारवड पोलीस ठाण्याने एका गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली हिरो कंपनीची मोटारसायकल संबंधित मालकाला सुपूर्द केली.
उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
या कार्यक्रमात जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पाटलांचाही सत्कार करण्यात आला. मंगरूळ (ता. अमळनेर) येथील पोलीस पाटील भागवत बापू पाटील यांचा अमळनेर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २९९/२०२६ च्या तपासात दिलेल्या विशेष सहकार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच मूळ मालकांना जलदगतीने परत मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गुन्ह्यांची प्रभावी उकल करून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
