मुख्य बाजारपेठ अंधारात; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ममुराबाद जन प्रतिनिधी गिरीश चौधरी
मुमराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकातील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने सायंकाळनंतर परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांची गैरसोय होत असून, ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुमराबादमधील प्रमुख आणि वर्दळीचा चौक असून येथे दररोज मोठी बाजारपेठ भरते. दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र, पथदिवे बंद असल्याने सायंकाळनंतर संपूर्ण परिसर अंधारमय होत असून नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसत असून, रात्रीच्या वेळेस ग्राहकांची वर्दळ कमी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच अंधारामुळे अपघात किंवा इतर अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन बंद पडलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पथदिवे सुरू झाल्यास चौक पुन्हा प्रकाशमान होऊन नागरिकांची सुरक्षितता आणि सोय वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
