महाराष्ट्रातील तरुण, महिला, बचत गट आणि व्यावसायिकांसाठी हरित उद्योगात व्यवसाय उभारण्याची सुवर्णसंधी
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे काम न राहता वेगाने विकसित होणारे हरित उद्योग (Green Business) क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरणपूरक धोरणे आणि पुनर्वापर (रिसायकलिंग) उद्योगाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ‘अमृत’ आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-सक्षम’ हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती, महिला बचत गट, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक, निवृत्त अधिकारी तसेच विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना कचरा व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कचऱ्यातून शाश्वत उत्पन्नाचे विविध पर्याय उपलब्ध असून सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूपनिर्मिती, प्लास्टिक, कागद आणि काच रिसायकलिंग तसेच रिसोर्स रिकव्हरी सेंटर (RRR) उभारणीसारख्या व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. योग्य तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या क्षेत्रात यशस्वी उद्योग उभारता येऊ शकतो.
या उपक्रमासाठी कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नसून इच्छुकांनी अमृत-सक्षमच्या नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. नोंदणीनंतर पात्र उमेदवारांशी अमृत-सक्षम टीम संपर्क साधून जिल्हानिहाय कार्यशाळा, प्रशिक्षण आणि पुढील प्रक्रियेची माहिती देणार आहे.
यासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता AMRUT च्या युट्यूब चॅनेलवर विशेष थेट (लाईव्ह) सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ७७५७०९१८५९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘अमृत-सक्षम… सक्षम उद्योजक… स्वावलंबी महाराष्ट्र… शाश्वत भविष्य…!’ तसेच ‘संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा; आजच हरित क्रांतीचा भाग व्हा!’ असे आवाहन अमृत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.
