डोंगर कठोरे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद; अध्ययन स्तर, वाचन व गणित कौशल्यांची घेतली चाचपणी
जळगाव | प्रतिनिधी
निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अध्यापनाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवारी (दि. १३ जुलै) जिल्हा परिषद शाळा, डोंगर कठोरे येथील शिक्षक राहुल वाणी यांच्या वर्गाशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला.
यावेळी करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अध्ययन स्तराची माहिती घेतली. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या स्तरानुसार प्रश्न विचारून अध्ययन प्रगतीची पडताळणी केली. तसेच त्या दिवसाच्या कृती आराखड्यानुसार कोणते अध्यापन झाले, याची माहिती शिक्षक व विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली.
आढाव्यादरम्यान स्तर ५ मधील विद्यार्थ्यांकडून २० पर्यंतच्या संख्यांचे वाचन करून घेतले. त्यानंतर बिनहातच्याची बेरीज फळ्यावर करून घेत विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्याची चाचणी घेण्यात आली. पुढे प्रगत स्तरातील एका विद्यार्थिनीला १०० पर्यंतच्या दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज करण्यास सांगितले असता तिने अचूक उत्तर दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिचे विशेष कौतुक केले.
यानंतर स्तर ५ वरील एका विद्यार्थिनीचे वाचन ऐकून त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत वर्गशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रगत गटातील विद्यार्थिनीने जोडाक्षरयुक्त शब्द व वाक्यांचे प्रभावी आणि अचूक वाचन करून दाखवल्याने करिश्मा नायर यांनी तिचे अभिनंदन करत इतर विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा, असे सांगितले.
व्हिडिओ संवादाच्या शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती, शिक्षकांचे नियोजन आणि निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
