थेट कर्ज, बीज भांडवल, व्याज परतावा, महिला स्वयंसिद्धी व कौशल्य विकास योजनांसाठी ऑनलाइन अर्जाचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जळगाव जिल्हा कार्यालय तसेच महामंडळाच्या विविध उपकंपन्यांमार्फत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज, व्याज परतावा आणि कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहेत. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेले सर्व भौतिक व आर्थिक उद्दिष्टे १०० टक्के पूर्ण करण्याचा महामंडळाचा मानस आहे.
महामंडळामार्फत संत काशिबा गुरव, जगदज्योती महात्मा बसवेश्वर, संत सेनाजी महाराज केशशिल्पी, संत नरहरी महाराज, संत श्री संताजी महाराज, संत श्री रुपलाल महाराज, स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी), सोळा कुलस्वामिनी, संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज, संत भोजलिंग काका सुतार, लेवा पाटीदार समाज, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज तसेच आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ अशा विविध उपकंपन्यांच्या माध्यमातून योजना राबविण्यात येत आहेत.
जिल्हा कार्यालयामार्फत २० टक्के बीज भांडवल योजना, एक लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज योजना, १५ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, १० ते ५० लाख रुपयांपर्यंत गट कर्ज व्याज परतावा योजना, १० ते २० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आणि कौशल्य विकास योजना अशा सात महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत.
महामंडळाच्या सर्व योजना पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जळगाव येथील जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
