जळगाव सायकलिस्ट ग्रुपची पंढरपूर सायकल वारी यशस्वी; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी सहभागी
जळगाव / पंढरपूर | प्रतिनिधी
जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या वारीत जळगावच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी सहभाग नोंदविला.
वारीच्या सांगता सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. १२ जुलै) पंढरपूर येथे राज्यभरातील विविध सायकलिंग ग्रुपमधील सुमारे ८ हजार सायकलिस्ट एकत्र आले. सर्वप्रथम सायकलपटूंनी पंढरपूर शहराची फेरी पूर्ण केली. त्यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भव्य सायकल रिंगण साकारण्यात आले. या विहंगम रिंगणाने उपस्थित भाविक आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक आणि नागरिकांनी या अनोख्या सोहळ्याला मोठी उपस्थिती लावली. शिस्त, एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या या रिंगणामुळे वारकरी परंपरा आणि सायकलिंग संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात जळगाव शहरातील ७५ सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले. सायकलवारीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, आरोग्यदायी जीवनशैली आणि वारकरी परंपरेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
