नशिराबाद (प्रतिनिधी):
नशिराबाद नगर परिषदेच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांपासून एकाच मक्तेदाराला कामे दिली जात असून, ही सर्व कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधित मक्तेदार, मुख्याधिकारी आणि बांधकाम अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नशिराबाद येथील रहिवासी दिपक भालचंद्र बोंडे यांनी १३ जुलै २०२६ रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.
नशिराबाद शहरात नगर परिषदेमार्फत रस्ते काँक्रीटीकरण, गटारी, कंपाउंड आणि थापे अशी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून, कामांचा दर्जा राखला गेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे, निकृष्ट कामे होत असतानाही संबंधित मक्तेदाराची बिले कशी काय अदा केली जातात, हा मुख्य प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
या गंभीर बाबीकडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि बांधकाम अभियंता सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. यावरून त्यांची आणि संबंधित मक्तेदाराची हातमिळवणी असल्याचे दिसून येत असून, या अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच निकृष्ट कामांची बिले काढली जात आहेत, असा ठपकाही अर्जात ठेवण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून एकाच मक्तेदाराला सतत कामे कशी दिली जात आहेत, याबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
*जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले निवेदन*
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित मक्तेदाराला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकावे, तसेच मुख्याधिकारी व बांधकाम अभियंत्यांवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन दिपक भालचंद्र बोंडे यांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक/अवल कारकून यांनी १३ जुलै २०२६ रोजी स्वीकारले आहे.
या गंभीर तक्रारीची दखल घेऊन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.
