महाराणा प्रताप स्मारक अभियानाचा ‘मागेल त्याला राष्ट्रपुरुषांचा पुतळा’ उपक्रम; देशभरात ५०० पुतळे उभारण्याचे उद्दिष्ट
शिरपूर | प्रतिनिधी
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे शिरपूर तालुक्यातील सावळदे गावात ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून तसेच पुष्पहार अर्पण करत ग्रामस्थांनी महाराणा प्रताप यांना अभिवादन केले. यावेळी ‘वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय’, ‘महाराणा प्रताप अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
धुळे तालुक्यातील नाणे गावात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी राजस्थान येथून शिरपूर मार्गे धुळ्याकडे जात असलेल्या पुतळ्याचे सावळदे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
‘मागेल त्याला राष्ट्रपुरुषांचा पुतळा’ अभियान
महाराणा प्रताप स्मारक अभियानाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला राष्ट्रपुरुषांचा पुतळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नाममात्र दरात देशभरातील विविध महापुरुषांचे पुतळे उपलब्ध करून दिले जात आहेत. कोणत्याही गावाने महापुरुषांच्या पुतळ्याची मागणी केल्यास तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अभियानाच्या माध्यमातून घेतली जात असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
या अभियानातून देशभरात ५००, महाराष्ट्रात १०० तर धुळे जिल्ह्यात महाराणा प्रताप यांच्या पाच पुतळ्यांची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
महापुरुषांचा गौरवशाली इतिहास, तरुण पिढीमध्ये इतिहासाबाबत जनजागृती आणि राष्ट्रपुरुषांचे विचार घराघरात पोहोचविणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमाला देशभरातून तसेच राज्य आणि धुळे जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी सावळदे गावाचे सरपंच व महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे प्रदेशाध्यक्ष सचिन राजपूत, प्रदेश प्रवक्ता जयपाल सिंह गिरासे, राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रवीर सिंह लमाना, लक्षराज सिंह मेवाड, संतोष जाधव, सरकार रावल, अमृतसिंग राजपूत, विजय गिरासे, वीर सिंग राजपूत, बिसपाल राजपूत, श्याम सिंग राजपूत, बन्सीलाल राजपूत, जगदीश राजपूत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
