पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य महाशिबिर; शेकडो नागरिकांची मोफत तपासणी, उपचार व आरोग्य मार्गदर्शन
पाळधी /जळगाव प्रतिनिधी दिनांक 13 जुलै : – ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणे, आजारांचे वेळेवर निदान करून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देणे आणि प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम बनविणे हे शासनाचे ध्येय आहे. “माझे गाव आरोग्य संपन्न गाव'” ही केवळ मोहीम नसून निरोगी समाज घडविण्याचा लोकचळवळीचा उपक्रम आहे, त्यासाठी आहार , योगा तसेच सर्व स्तरातून सहकार्य करून आरोग्य संपन्न गाव करावे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र पाळधी बु. अंतर्गत आयोजित भव्य आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यांची होती उपस्थिती
यावेळी ,जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, लोकनियुक्त सरपंच विजय पाटील, उपसरपंच निसार शेठ, कैलास इंगळे, राहुल धनगर, प्राथमिक आरोग्य केंद्र पाळधी बु.चे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश झवर, डॉ. स्वरांजली कदम तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व पाळधी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र येथील कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
महाशिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, कुष्ठरोग, सर्दी-खोकला, व्हायरल ताप यांसह विविध आजारांची तपासणी, निदान व उपचार करण्यात आले. गरजेनुसार रुग्णांना औषधांचे मोफत वितरण करण्यात आले तसेच पुढील उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय सल्ला व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सायमा खान व डॉ. रितूल पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. आरोग्य सहाय्यक, गटप्रवर्तक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उल्लेखनीय परिश्रम घेतले.
या महाशिबिराचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. गावातच तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
