शेतकरी न्याय, सुशासन आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासनासाठी घेतलेल्या भूमिकेची दखल
भुवनेश्वर दुसाने पाचोरा | प्रतिनिधी
लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधीचे मूल्यमापन केवळ निवडणुकीतील विजयावर होत नाही, तर जनतेच्या प्रश्नांबाबत घेतलेल्या भूमिकेवर, शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यावर आणि समाजहितासाठी निर्माण केलेल्या विश्वासावर होत असते. भडगाव–पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि सुशासनासाठी घेतलेल्या ठोस भूमिकेची दखल घेत पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. चाळीसगाव व जामनेर तालुक्यांप्रमाणेच पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही समान न्याय मिळावा, या मागणीसाठी उपोषणकर्ते गुलाबसिंग पाटील आणि आंदोलक संदीप महाजन यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला आमदार किशोरआप्पा पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा दिला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक प्रस्ताव तातडीने मंत्रालयात पाठविण्याच्या सूचना देत त्यांनी हा विषय शासनाच्या निर्णय प्रक्रियेपर्यंत पोहोचविला.
उपोषणादरम्यान आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्यावरही त्यांनी स्वतः पुढाकार घेत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास दिला. त्यानंतर झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाचोरा तालुक्यासाठी २७ कोटी रुपये आणि भडगाव तालुक्यासाठी २२ कोटी रुपये, असा एकूण ४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निर्णयामुळे हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
याचबरोबर राज्याच्या २०२६ च्या पावसाळी अधिवेशनात आमदार किशोरआप्पा पाटील यांनी अन्न व औषधे प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्याचे विधानसभेत जाहीर कौतुक केले. प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि पारदर्शक प्रशासन देणाऱ्या अधिकाऱ्यांना सातत्याने काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्न व औषधे प्रशासन विभागात सक्षम आणि सातत्यपूर्ण नेतृत्व राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सुशासनाला बळ देणे, या दोन्ही भूमिकांमधून आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या कार्यशैलीचे वेगळेपण अधोरेखित झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही या निर्णय प्रक्रियेत सकारात्मक भूमिका बजावल्याबद्दल शेतकरी वर्गाने कृतज्ञता व्यक्त केली. पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आलेला हा सत्कार जनहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
