रेशन कार्ड, दाखले आणि धान्य वितरणाच्या कामांवर परिणाम; रिक्त पदे तातडीने भरण्याची नागरिकांची मागणी
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता असल्याने विभागाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. रेशन दुकानदारांशी संबंधित कामे, धान्य वितरण, शिधापत्रिकेची प्रकरणे तसेच विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक दाखले देण्यास विलंब होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या पुरवठा विभागाचा कारभार केवळ दोन कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या कामाच्या ताणामुळे अनेक कामे प्रलंबित राहत असून नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
रेशन कार्डच्या कामांना विलंब
नवीन शिधापत्रिका (रेशन कार्ड) मंजूर करणे, नावात बदल करणे, शिधापत्रिकेतील दुरुस्ती, महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक दाखले देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
महत्त्वाची पदे रिक्त
पुरवठा विभागातील धान्य गोदाम व्यवस्थापक, पुरवठा निरीक्षक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर ही महत्त्वाची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कामाचा अतिरिक्त भार विद्यमान कर्मचाऱ्यांवर पडत असून सेवा वितरणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन रिक्त पदांवर तातडीने भरती करावी, तसेच पुरवठा विभागाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून नागरिकांना वेळेवर सेवा मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
