नाशिक विभागीय सहनिबंधकांकडून जिल्हा उपनिबंधकांना पत्र; सुरेश पाटील यांच्या तक्रारीची दखल
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाविरोधातील तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांना दोन स्वतंत्र पत्रांद्वारे सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही दोन्ही पत्रे दि. १३ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आली आहेत.
पहिल्या पत्रात बँकिंग रेग्युलेशन (सुधारणा) अधिनियम, २०२५, रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वे आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर अपात्रतेची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्रासह सुरेश पाटील यांच्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुसऱ्या पत्रात बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५, RBI च्या मार्गदर्शक सूचना आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी न करता मागील सुमारे २२ महिन्यांपासून कथित नियमबाह्य कारभार झाल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित अधिकारी व संचालकांवर आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईबाबत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या दोन्ही पत्रांमध्ये लोकनियुक्त सरपंच तथा तक्रारदार श्री. सुरेशआप्पा गो. पाटील (रा. झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांनी केलेल्या निवेदनातील मुद्द्यांनुसार स्थानिक स्तरावर चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.
या घडामोडींमुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाहीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
