बाबासाहेबांचे विश्वासू सहकारी, कुशल संघटक आणि समता चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे प्रेरणादायी जीवन
विशेष लेख | संघरत्न सपकाळे, भुसावळ
भारतीय सामाजिक चळवळीच्या इतिहासात अनेक कार्यकर्त्यांनी पडद्यामागे राहून मोठे योगदान दिले. अशाच निष्ठावंत, धाडसी आणि समर्पित कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा (१८७९–१९४८). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, अंगरक्षक, कुशल संघटक आणि कामगार चळवळीतील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
मडकेबुवा सुरुवातीला माळकरी बुवा म्हणून ओळखले जात होते. ते भगवा वेष धारण करत असत. त्याचबरोबर ते उत्कृष्ट मोटार मेकॅनिक होते. संभाजी तुकाराम उर्फ दादासाहेब गायकवाड यांच्याकडून त्यांनी मोटार दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी माळा आणि भगवा वेषाचा त्याग केला. त्यानंतर त्यांनी मखमली नऊवारी धोतर, कोट आणि काळी किंवा मखमली टोपी असा साधा पण देखणा पोशाख स्वीकारला आणि तो आयुष्यभर कायम ठेवला.
आफ्रिकेतील नोकरी सोडून भारतात परतले
त्यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना १९२८ मध्ये आफ्रिकेत बॉयलर मेकर म्हणून दरमहा ४०० रुपयांच्या पगारावर नोकरी दिली. मात्र तेथे वातावरणाशी जुळवून घेता न आल्याने १९२९ मध्ये ते भारतात परतले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी मडकी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतरच त्यांना “मडकेबुवा” म्हणून ओळख मिळाली.
बाबासाहेबांचे विश्वासू सहकारी आणि अंगरक्षक
१९२४ मध्ये दामोदर हॉल परिसरात राहात असल्यामुळे त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी निकटचा परिचय झाला. पुढे ते बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि निष्ठावंत अनुयायी बनले.
पुणे कराराच्या काळात देशात तणावपूर्ण वातावरण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत मडकेबुवा बाबासाहेबांच्या नकळत सावलीसारखे त्यांच्या सोबत राहत आणि प्रत्येक संकटात त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत. त्यामुळे त्यांना बाबासाहेबांचे “बॉडीगार्ड” म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
कामगार आणि सामाजिक चळवळीतील प्रभावी नेतृत्व
१९३४ मध्ये स्थापन झालेल्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, तर मडकेबुवा चिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार चळवळीत प्रभावी नेतृत्व केले.
डॉ. आंबेडकरांनी त्यांची “मुंबई प्रदेश शेड्युल्ड कास्ट फेडरेशन”च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. ते उत्कृष्ट संघटक आणि प्रभावी वक्ते होते. मुंबईतील बाबासाहेबांच्या सभा, परिषदांचे नियोजन आणि आयोजनात त्यांची महत्त्वाची भूमिका असे.
‘पोलादी पुरुष’ म्हणून ओळख
ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांना “पोलादी पुरुष” म्हटले जाते, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील निष्ठा, धैर्य आणि समर्पणामुळे मडकेबुवांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोलादी पुरुष” असे संबोधले जाते.
बाबासाहेबांचा भावनिक शोकसंदेश
२८ मार्च १९४८ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मडकेबुवांचे निधन झाले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीत कायदेमंत्री म्हणून कार्यरत होते. मडकेबुवांच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी शोकसंदेश पाठवला.
त्यात त्यांनी म्हटले होते,
“बुवांच्या निधनाची वार्ता ऐकून धक्काच बसला. अस्पृश्यांचा एक मोठा कार्यकर्ता, कामगारांचा एक ट्रेड युनियनिस्ट आणि शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचा एक प्रभा
वी संघटक नाहीसा झाला आहे.”
वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी हा शोकसंदेश वाचून दाखविण्यात आला. त्यावेळी समता सैनिक दलाने त्यांना मानवंदना दिली.
मडकेबुवांचे जीवन हे निष्ठा, धैर्य, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण मानले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात त्यांनी दिलेले योगदान आजही इतिहासात अढळ स्थान राखून आहे.
