भवरलालभाऊ जैन तालुका सार्वजनिक शासकीय वाचनालयाचा उपक्रम; अशोकभाऊ जैन यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
योगेश पाटील ।धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव येथील पी. आर. हायस्कूलमध्ये भवरलालभाऊ जैन तालुका सार्वजनिक शासकीय वाचनालयाच्या वतीने आणि जैन इरिगेशनचे संचालक अशोकभाऊ जैन यांच्या सहकार्याने मंगळवारी (दि. १४ जुलै) मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील होते.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अशोकभाऊ जैन यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षांपासून धरणगाव तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले जात आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून, शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध झाल्याने त्यांना शिक्षणात मदत होते.
ते पुढे म्हणाले की, अनेक दानशूर व्यक्ती शैक्षणिक साहित्य वाटपाचे उपक्रम राबवत असतात. मात्र शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच वह्यांचे वितरण झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा अधिक लाभ होतो. समाजातील सक्षम व्यक्तींनी अशा उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला वाचनालयाचे उपाध्यक्ष तथा भावी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, पर्यवेक्षक डी. एच. कोळी, वाचनालयाचे सचिव योगेश पी. पाटील, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील, माजी नगरसेवक नंदकिशोर पाटील, एस. के. बेलदार, जी. आर. सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
