अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, इतर चोरीच्या घटनांबाबतही तपास सुरू
भडगाव | प्रतिनिधी – गणेश रावळ
भडगाव पोलिसांनी सोलर प्लांटमधील कॉपर वायर चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत उलगडा करत ९ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ₹५ लाख १५ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसरातील सोलर प्रकल्पांमधील चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलैच्या मध्यरात्री नियमित गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या काही इसमांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत त्यांनी भडगाव रोडलगत असलेल्या सोलर प्लांटमधून कॉपर वायर चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ९ आरोपींना अटक केली. आरोपींकडून सुमारे ४,००० मीटर सोलर कॉपर वायर, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, ८ मोबाईल फोन, एक मोटारसायकल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले इतर साहित्य असा एकूण ₹५.१५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींकडून जिल्ह्यातील इतर चोरीच्या घटनांबाबतही सखोल चौकशी सुरू आहे. या तपासातून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्यासह गोहर्धन बोरसे, निलेश ब्राम्हणकर, हंसराज देशमुख, भावराव पाटील, दीपक पाटील, प्रवीण परदेशी, सुनील राजपूत, संदीप सोनवणे आणि प्रदीप परदेशी यांनी मोलाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस हवालदार गोहर्धन बोरसे करीत आहेत.
