पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या वतीने वह्या, पुस्तके व शालेय साहित्याचे वितरण
धरणगाव | प्रतिनिधी (प्रशांत शिंदे)
धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (सेमी इंग्रजी) येथे गुरुवारी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके तसेच विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. नियमित अभ्यास, शिस्त, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर जीवनात यश संपादन करता येते, असा संदेश देत विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, सरपंच सुदर्शन पाटील, पालक समितीचे अध्यक्ष मोहन शिंदे, चंदनपुरी गोसावी, भरत पाटील, दिनू आप्पा, बबलू शिंदे, अरुण पाटील, भाऊसाहेब नाव्ही यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, समाजातील सर्व घटकांनी शिक्षणवृद्धीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
