ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याच्या टाकीमुळे व्यापारी व ग्राहक त्रस्त; मनपा प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
जळगाव | प्रतिनिधी (सोमेश मुळे)
जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटच्या ‘सी’ विंगमध्ये गंभीर आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाल्याने टाकी भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी थेट खाली साचत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, शेवाळे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून व्यापारी व ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याची टाकी भरल्यानंतर अतिरिक्त पाणी योग्य निचऱ्याअभावी थेट तळमजल्यावरील मोकळ्या जागेत साचते. हे पाणी अनेक दिवस साचून राहत असल्याने फरशी आणि भिंतींवर शेवाळे तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा पाय घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे साचलेल्या पाण्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास वाढत असल्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असून, तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
गोलाणी मार्केटमध्ये दररोज हजारो ग्राहक खरेदीसाठी येतात. मात्र, ‘सी’ विंगमधील अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांच्या त्रासामुळे अनेक ग्राहक या भागात जाणे टाळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे.
“महानगरपालिका नियमित कर आकारते, मात्र मूलभूत सुविधांच्या देखभालीकडे दुर्लक्ष का केले जाते?” असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
व्यापाऱ्यांनी मनपा प्रशासनाकडे पाण्याच्या टाकीला ऑटोमॅटिक कट-ऑफ प्रणाली बसविणे, ओव्हरफ्लो पाईपची योग्य व्यवस्था करणे, साचलेले पाणी तातडीने उपसणे तसेच जंतुनाशक औषधांची फवारणी व ब्लिचिंग पावडर टाकण्याची मागणी केली आहे.
एखाद्या साथीच्या आजाराचा उद्रेक होण्यापूर्वीच जळगाव महानगरपालिकेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांकडून होत आहे.
