कर्ज थकबाकीमुळे फायनान्स कंपनीने केलेल्या जप्तीची कारवाई धाब्यावर; नोटीस फाडून घरात वास्तव्यास सुरुवात
जळगाव | प्रतिनिधी
कर्ज थकबाकीमुळे फायनान्स कंपनीने जप्त करून सील लावलेल्या घराचे सील तोडून बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जप्त मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानळदा रोडवरील राजाराम नगर परिसरात आकाश पुरुषोत्तम सैंदाणे यांचे घर असून, या घरासाठी त्यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे हप्ते नियमित न भरल्याने संबंधित फायनान्स कंपनीने नियमानुसार घर जप्त करून त्यावर सील लावले होते.
तक्रारीनुसार, दि. २३ जून रोजी रात्री आकाश सैंदाणे, विशाल सैंदाणे, पुरुषोत्तम सैंदाणे आणि सुनंदा सैंदाणे यांनी घरावरील जप्तीची नोटीस फाडली तसेच सील तोडून घरात बेकायदा प्रवेश करत तेथे वास्तव्यास सुरुवात केली.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे करीत आहेत.
