२८ वर्षीय तरुणासह ५६ वर्षीय व्यक्तीने घेतला गळफास; पोलिसांकडून अकस्मात मृत्यूच्या नोंदी
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहर आणि तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे शिरसोली आणि विठ्ठलपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही प्रकरणांची नोंद पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
शिरसोली येथे २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे निवृत्ती गोकूळ बोबडे (वय २८) यांनी बुधवारी (१५ जुलै) सकाळी राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
निवृत्ती यांची आई त्यांना बोलविण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता हा प्रकार तिच्या निदर्शनास आला. मुलाचा मृतदेह पाहून तिला मोठा धक्का बसला.
निवृत्ती बोबडे हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विठ्ठलपेठेत ५६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
जळगाव शहरातील विठ्ठलपेठ परिसरात कमलाकर बळीराम नेमाडे (वय ५६) यांनी १४ जुलै रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटना लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार प्रमोद पाटील करीत आहेत. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
