रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास; पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
पारोळा शहरातील वर्धमान नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेपासून १५ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
या चोरीत ६० हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच २ हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर गोपीचंद पाटील (वय ४७, रा. पारोळा) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, शहरातील बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
