४.१२ लाखांचा गांजा व ५ लाखांची सियाज कार जप्त • मुख्य पुरवठादार फरार; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
सुनील निकम धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेने धुळे-शिरपूर महामार्गावर मोठी कारवाई करत सुमारे १६ किलो गांजासह दोघांना अटक केली. या कारवाईत ४ लाख १२ हजार रुपये किमतीचा गांजा आणि ५ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी सियाज कार असा एकूण ९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य पुरवठादार आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मारुती सुझुकी सियाज (क्रमांक MH-47/C-1008) मधून काही जण धुळेहून शिरपूरकडे गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचे नियोजन केले.
दि. १६ जुलै २०२६ रोजी धुळे-शिरपूर महामार्गावरील हॉटेल डी.डी.आर.सी. समोर सापळा रचण्यात आला. संशयित वाहन थांबवून राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच, छायाचित्रकार आणि वजनकाटा धारक यांच्या उपस्थितीत तपासणी केली असता वाहनातून सुमारे १६ किलो गांजा जप्त करण्यात आला.
या कारवाईत विनेश गुलाब पावरा (वय ३२) आणि ताराचंद उत्तरसिंग वळवी (वय ३४, दोघे रा. उमर्दा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांना अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपींनी हा गांजा इरफान शकील पिंजारी (रा. शंभर फुटी रोड, जामचा मळा, धुळे) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. मात्र, इरफान पिंजारी हा सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २११/२०२६ नोंदविण्यात आला असून, एनडीपीएस अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध तस्करीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, फरार आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.
