पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद • प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, ॲड. पंकज गोरे यांचे आवाहन
सुनील निकम । धुळे | प्रतिनिधी
माजी पर्यावरण मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धुळ्यात व्यापक हरित अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना एक हजार वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात येत असून, उपक्रमाला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
युवासेना राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, केवळ वृक्षरोपांचे वितरण न करता प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरण समृद्ध करण्याची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढते तापमान, हवामानातील बदल, घटते वनक्षेत्र, भूजल पातळीतील घट आणि प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरासमोर, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, शेताच्या बांधावर तसेच मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत फळझाडे, सावलीची झाडे तसेच पर्यावरणपूरक विविध प्रजातींची वृक्षरोपे नागरिकांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत. घर, सोसायटी, शेत किंवा सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कार्यालय, भगवा चौक, धुळे येथे संपर्क साधून वृक्षरोपे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यालाही मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी एक हजार वृक्षरोपांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक या अभियानात सक्रिय सहभाग घेत असून, धुळे शहर अधिक हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त करत आहेत.
यावेळी ॲड. पंकज गोरे म्हणाले, “वृक्ष हेच भविष्यातील जीवनाचे आधार आहेत. आज लावलेले एक झाड पुढील अनेक पिढ्यांना शुद्ध हवा, सावली आणि पर्यावरणाचा समतोल देणार आहे. त्यामुळे वाढदिवस, लग्न, स्मृतिदिन किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये वृक्षलागवड करण्याची परंपरा रुजविण्याची गरज आहे.”
या प्रसंगी प्रवीण मुर्तडक, विनोद रणमळे, आप्पा भडागे, मंगेश पिंगळे, किशोर बोरसे, पंकज शाह, भटू देसले, मयूर कुळकर्णी, सौरभ जवराल, ज्ञानेश्वर देवरे, बंटी गोरे, भावेश अहिरराव, गोकुळ येलमामे, आशिष गोरे, पवन खांडरे, गोपाल प्रजापत, विक्की गर्ग, योगेश निकम यांच्यासह भगवा चौक येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
