ऑनलाइन फसवणूक, फिशिंग व डिजिटल सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर वॉरियर’ उपक्रमांतर्गत आयोजन
पाळधी (ता. धरणगाव) | प्रतिनिधी
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील विद्यालय, पाळधी येथे इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. कणखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विद्यार्थिनी साक्षी पाटील आणि विद्या सोनवणे यांनी Quick Heal Foundation च्या Cyber Warrior उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी आणि पासवर्ड सुरक्षितता, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
संवादात्मक पद्धतीने पार पडलेल्या या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबतच्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक मा. कणखरे सर यांनी मार्गदर्शकांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने व सुरक्षितपणे वापर करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला
