भर पावसात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम सुरू असताना दुर्घटना; कुटुंबीयांना आर्थिक मदत व चौकशीची मागणी
अजय बाविस्कर अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील नगाव गावातील महावितरणचे वायरमन शरद गोसावी यांचा कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे महावितरण कर्मचाऱ्यांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील भगवा चौक परिसरात शरद गोसावी हे सहकाऱ्यांसह वीज दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी अचानक नेमके काय घडले याचा उलगडा अद्याप झालेला नसून, अधिकृत चौकशीनंतरच कारण स्पष्ट होणार आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ते काही मिनिटे वीजेच्या खांबावर लटकलेल्या अवस्थेत होते. त्यानंतर ते खाली कोसळले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
शरद गोसावी यांनी यापूर्वीही मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यात आर. के. नगर परिसरातील तिरपा झालेला वीज खांब व रोहित्र दुरुस्त करून नागरिकांचा वीजपुरवठा सुरळीत केला होता. कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावासाठी ते ओळखले जात होते.
त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आजारी आईसह संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. महावितरणने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी तसेच घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
