मानवी कवटी संबंधित धक्कादायक शेत परिसर पूर्णपणे बाभळीच्या झाडांनी झाकलेला असल्याने तिथे काही बेकायदेशीर हालचाली चालत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
नशिराबाद | प्रतिनिधी |
नशिराजवळील महालक्ष्मी चौफुली परिसरातील एका शेतात मानवी कवटी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. दिलीप चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९८५ मधील पडीक शेतात ही घटना समोर आली. माजी जि.प. उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांनी पोलीस ठाण्यात याची सूचना दिल्यानंतर, सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जात पाहणी केली.

पोलिसांनी संपूर्ण शेताची कसून तपासणी केली असता, त्या ठिकाणी कवटीशिवाय इतर कोणतेही हाडे किंवा मानवी अवशेष सापडले नाहीत. पोलिसांनी कवटी ताब्यात घेऊन पंचनामा केला असून, ती नेमकी किती जुनी आहे, स्त्रीची आहे की पुरुषाची, हे शोधण्यासाठी नमुने नाशिक व धुळे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच यामागील सत्य समोर येईल.
दरम्यान, हे शेत बऱ्याच काळापासून पडीक असून तिथे घनदाट बाभळी वाढल्या आहेत. या आडोशाने परिसरात अवैध प्रकार होत असल्याची कुचबुच नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे हे झाडं त्वरीत साफ करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ही कवटी तिथे कशी आली आणि यामागे काय गूढ आहे, याचा सखोल तपास नशिराबाद पोलिसांकडून सुरू आहे
