चिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवून नराधमाने बालिकेला ओढले जाळ्यात; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
नशिराबाद | प्रतिनिधी |
नशिराबाद परिसरातून एक अतिशय संतापजनक आणि अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. अवघ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला गोडगोड बोलून आणि चिकू खाण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने बळकावून नेत तिच्यावर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सावके (रा. गोदावरी हॉस्पिटल कॅम्पस, सुपरवायझर) या संशयिताविरुद्ध पोस्को कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला अमिषास बळी पाडून तिला परिसरातील चिकूच्या मळ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गुन्ह्याची गांभीर्यता पाहता, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सूत्रे हलवण्यात आली आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांच्याकडे या गुन्ह्याचा सखोल तपास सोपवण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी हे पथकातील सहकारी कर्मचारी गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर भिडे, आरिफ तडवी, रामकृष्ण माळी, प्रवीण लोहार आणि भूषण पाटील यांच्यासह या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत कायदेशीर व तातडीची कारवाई सुरू होती.
