नांदुरबार-धुळे बस नागवाबारीजवळ आगीच्या भक्ष्यस्थानी; बोनेटमधील बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
सुनील निकम धुळे | प्रतिनिधी
धुळे येथे नांदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ४९ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आणि एक मोठी दुर्घटना टळली.
ही घटना धुळे जिल्ह्यातील नागवाबारीजवळील सातपुडा शाळेसमोर दुपारी १२:३० ते १२:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, बसच्या बोनेटमधील बिघाडामुळे आग लागली. बोनेटमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बसला वेढले.
आगीत शिवशाही बस पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र चालकाच्या तत्परतेमुळे बसमधील सर्व ४९ प्रवाशांचे प्राण वाचले.
आगीची माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
नंदुरबार आगारातून सकाळी ही शिवशाही बस ४९ प्रवाशांना घेऊन धुळ्याकडे रवाना झाली होती. धुळ्यात प्रवेश करतानाच नागवाबारी परिसरात बसच्या बोनेटमध्ये बिघाड होऊन आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आगीच्या नेमक्या कारणाचा पुढील तपास सुरू आहे.
