सीसीटीव्ही कॅमेऱ्याला सॉक्स घालून शटर तोडत चोरट्यांचा डाव यशस्वी; भरवस्तीतील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पहूर, ता. जामनेर | प्रतिनिधी
पहूर कसबे येथील साई ज्वेलर्स या सराफा दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करत सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.
पहूर बस स्थानकाजवळ असलेल्या अर्जुन रामदास सोनवणे यांच्या साई ज्वेलर्स या सराफा दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री ते मंगळवारी सकाळी चार वाजेच्या दरम्यान शटर तोडून प्रवेश केला. चोरीपूर्वी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला सॉक्स घालून त्याची नोंद होऊ नये, यासाठी खबरदारी घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दुकानातील सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास करून चोरटे पसार झाले.
भरवस्तीतील सराफा दुकान फोडून चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी साई ज्वेलर्सचे संचालक अर्जुन रामदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भरवस्तीत घडलेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, संबंधित दुकान बस स्थानकाजवळ असूनही चोरट्यांनी चोरीचा डाव यशस्वीपणे साधल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या धाडसी चोरीमुळे पहूर पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पहूर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रवीण दातीर व त्यांचे सहकारी करीत आहेत.
दरम्यान, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीच्या पोलीस गस्तीमध्ये वाढ करण्याची जोरदार मागणी केली आहे. नियमित गस्त आणि कडक सुरक्षा उपाययोजना राबविल्यास अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे
