‘जय भीम’च्या जयघोषात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार; हजारो भीमसैनिकांचा सहभाग
भुसावळ | संघरत्न सपकाळे
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात भुसावळ शहरात बुधवारी, दि. २२ जुलै रोजी भर पावसात विराट महामोर्चा काढण्यात आला. ‘जय भीम’च्या जयघोषात हजारो आंबेडकरी अनुयायी या मोर्चात सहभागी झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींसाठी दिलेली १३ टक्के आरक्षणाची चौकट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नावाखाली शासन मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अनुसूचित जातीतील ५९ जाती एकसंध राहाव्यात आणि आरक्षणाची विद्यमान चौकट कायम ठेवावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

शहरातील नहाटा महाविद्यालय परिसरातून या विराट महामोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा मार्गक्रमण करत प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी भीमसैनिकांनी संविधान रक्षणाच्या घोषणा देत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
दुपारी १२ वाजल्यापासून शहरासह ग्रामीण भागातील भीमसैनिक नहाटा महाविद्यालय परिसरात जमण्यास सुरुवात झाली. दुपारी २ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मोर्चात शहर आणि ग्रामीण भागातील हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. विशेषतः महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी “जय भीम”, “दिलं भीमानं खा गुमानं”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”, “आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा” अशा घोषणा देण्यात आल्या.
हा विराट एल्गार महामोर्चा अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, भुसावळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
