विनोद घेगडे यांची पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती
जयदीप कवाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; अनेक कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील युवा उद्योजक विनोद घेगडे यांची प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी बॅलार्ड पियर येथील पक्षाच्या मुख्यालयात नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
यावेळी जयदीप कवाडे यांनी विनोद घेगडे यांना पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. नियुक्तीनंतर घेगडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
कार्यक्रमाला युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमित सोनावणे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते कपिल लिंगायत, राजेश उबाळे, राजू लोखंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
