जिल्हा बँकेच्या भंगार विक्री व MIDCतील P-5 जागेच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह; माहिती देण्यास टाळाटाळचा आरोप
भंगार लिलाव व भाडेपट्ट्याची कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी; माहिती न दिल्यास न्यायालयीन लढ्याचा इशारा
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भंगार साहित्य विक्री प्रक्रियेसह एमआयडीसी परिसरातील P-5 जागा नेमकी कोणाला,
कोणत्या अटींवर आणि कोणत्या मंजुरीच्या आधारे भाड्याने देण्यात आली, याबाबत माहिती देण्यास बँक प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप समोर आला आहे.
लोकनियुक्त सरपंच सुरेशआप्पा पाटील (झुरखेडा) यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक यांच्याकडे या दोन्ही व्यवहारांची सविस्तर माहिती मागितली आहे. यापूर्वी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनीही संबंधित प्रकरणात बँकेकडून माहिती मागविल्याचे सांगितले जात असून, ती वरिष्ठ स्तरावरही उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे, “राज्याच्या प्रधान सचिवांनाही माहिती दिली जात नसेल, तर सामान्य नागरिकाला ती कशी मिळणार?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
निवेदनात भंगार साहित्याची संपूर्ण यादी, मूल्यांकन अहवाल, संचालक मंडळ व सर्वसाधारण सभेचे ठराव, लिलावाची जाहिरात, निविदा प्रक्रिया, सहभागी बोलीदारांची यादी, अंतिम मंजुरी आदेश, छायाचित्रे, व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच लिलावातून प्राप्त झालेल्या रकमेचा संपूर्ण तपशील उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच एमआयडीसी परिसरातील P-5 जागेच्या भाडेपट्ट्याशी संबंधित मंजुरी आदेश, करारनामा, मूल्यांकन अहवाल, निविदा प्रक्रिया, भाडे निश्चितीचा आधार आणि संबंधित व्यवहाराची संपूर्ण माहितीही देण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित माहिती वेळेत उपलब्ध करून न दिल्यास किंवा माहिती जाणीवपूर्वक दडविल्याचे आढळल्यास सहकार विभाग, निबंधक कार्यालय तसेच इतर सक्षम प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करून आवश्यक असल्यास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
