उमेद अभियानातील ३८ मशीन बंद; भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी, महिलांचा आंदोलनाचा इशारा
९ ऑगस्टपासून बिऱ्हाड आंदोलन, १५ ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा; निकृष्ट दर्जाच्या मशीन वाटपाचा आरोप
सुनील निकम धुळे | प्रतिनिधी
उमेद अभियान व मानव विकास योजनेअंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी वितरित करण्यात आलेल्या ३८ मशीन बंद अवस्थेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि महिला बचत गटांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या मशीनचे वाटप करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल, सखी महिला ग्रामसभा बचत गटाच्या भारती माळी आणि बचत गटातील महिलांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. जिल्हास्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत ९ ऑगस्टपासून बिऱ्हाड आंदोलन सुरू करण्यात येईल, तसेच १५ ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आला.

माहितीनुसार, धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि मानव विकास योजना यांच्या माध्यमातून सन २०२२-२३ मध्ये धुळे तालुक्यातील महिला बचत गटांना उद्योगासाठी विविध प्रकारच्या ३८ मशीनचे वाटप करण्यात आले होते. मात्र, कालांतराने ही यंत्रे निकृष्ट दर्जाची असल्याने बंद पडली असून त्यामुळे महिलांच्या रोजगारावर परिणाम झाला असल्याचा दावा करण्यात आला.
विश्वनाथ येथील मशीन युनिट पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शासनासह महिलांची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
पत्रकार परिषदेला दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल, शंकर खरात, सखी महिला ग्रामसभा बचत गटाच्या भारती माळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
