पावसाने दिला दिलासा; कोमेजलेली पिके पुन्हा तरारली, पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित
जूनमधील पावसाअभावी शेतकरी संकटात; वृक्षलागवड, प्रदूषण नियंत्रण व गौण खनिज उत्खनन रोखण्याचे आवाहन
रतन अडकमोल एरंडोल तालुका ग्रामीण प्रतिनिधी
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तीव्र उष्णतेमुळे पिके कोमेजली, शेतातील ओलावा संपुष्टात आला आणि उकाड्याने जनजीवनही विस्कळीत झाले. यावर्षी जून महिन्यात ढगांची दाटी, विजांचा कडकडाट आणि पावसाची साथ जवळपास नव्हती.
मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने नियमित हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे कोमेजलेली पिके पुन्हा तरारली असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. शेतांमध्ये हिरवळ बहरली असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल चिंतेचा विषय ठरत आहेत. कधी तीव्र उष्णता, कधी दुष्काळसदृश परिस्थिती, तर कधी अतिवृष्टी अशा अनियमित हवामानाचा शेती व पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे, विद्यमान वृक्षांचे संरक्षण करणे, प्रदूषणावर नियंत्रण आणणे, नद्यांमधील बेकायदेशीर वाळू उपसा थांबवणे तसेच डोंगर-टेकड्यांमधील बेसुमार गौण खनिज उत्खननावर आळा घालणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतल्यास भविष्यात हवामानातील अस्थिरता कमी होण्यास मदत होईल आणि शेतीसह मानवी जीवन अधिक सुरक्षित राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
