आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळ्यात भव्य रथोत्सव; श्री विठ्ठल मंदिरात जय्यत तयारी
२५ जुलै रोजी धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन; भाविकांना उपस्थितीचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी
पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थान (वाणी पंच मंडळ) यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, दि. २५ जुलै रोजी भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून रथोत्सवाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.
रथोत्सवानिमित्त मंदिर संस्थानतर्फे पारंपरिक रथाची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून रथाला देखणी सजावट करण्यात येत आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जात असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. यंदाही विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात रथोत्सव उत्साहात पार पडणार असून धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रथोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
