हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले; तापी नदीपात्रात ५,२२७ क्युसेक पाण्याचा विसर्ग
धरणातील पाणीसाठा ६९.२० टक्क्यांवर; नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
भुसावळ | प्रतिनिधी
तापी नदीवरील हतनूर धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने धरणाचे चार वक्राकार दरवाजे प्रत्येकी ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीपात्रात १४८ घनमीटर प्रति सेकंद (सुमारे ५,२२७ क्युसेक) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवार, २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत धरणातील एकूण जलसाठा २६८.५० दशलक्ष घनमीटर (६९.२० टक्के) इतका झाला आहे. तर उपयुक्त (लाइव्ह) जलसाठा १३५.५० दशलक्ष घनमीटर (५३.१४ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.
हतनूर धरणाची पूर्ण जलसाठा पातळी २१४.००० मीटर असून, सध्या धरणातील पाण्याची पातळी २११.७५० मीटर इतकी आहे. दरम्यान, कालव्यामधून ५.६६ घनमीटर प्रति सेकंद (२०० क्युसेक) पाणी सोडण्यात येत असून, आर.एस. गेटद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
धरण परिसरात बुधवारी १२ मिमी पावसाची नोंद झाली असून, चालू पावसाळ्यातील एकूण पर्जन्यमान १३३ मिमी इतके झाले आहे.
धरणातून तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि मच्छीमारांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन संबंधित प्रशासनाने केले आहे.
