सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन
पुणे | प्रतिनिधी (एस.एन.नांदेडकर)
पँथर संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनेप्रती असलेली आपली निष्ठा आणि बांधिलकी कृतीतून सिद्ध करावी. ज्यांना संघटनेत मनापासून काम करायचे आहे, त्यांनी आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पँथर संघटनेचा अधिकृत लोगो स्वाभिमानाने लावून अन्याय, अत्याचार आणि भेदभावाविरोधात निर्भयपणे आवाज उठवावा, असे आवाहन पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय नडगेरी यांनी केले.
ते म्हणाले की, पँथर संघटना ही सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी कार्य करणारी चळवळ असून, प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने समाजातील अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी पँथर संघटना कायम उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संघटनेचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनेची ओळख अभिमानाने जपावी तसेच सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घ्यावी, असेही संजय नडगेरी यांनी आवाहन केले.
