धरणगाव–एरंडोल पुलावरील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवा; माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांची मागणी
खड्ड्यात पडून दोन ज्येष्ठ नागरिक जखमी; अपघात टाळण्यासाठी दोन दिवसांत दुरुस्तीची मागणी
धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव शहरातील उड्डाणपुलाकडून एरंडोलकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाजवळ मोठे आणि जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केली आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी या खड्ड्यात दुचाकी घसरून दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने त्यावेळी मागून कोणतेही मोठे वाहन आले नसल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रिक्षाद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राध्यापक भदाणे यांनीही मदतकार्य केले. जखमींच्या डोक्याला व पायाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली.
या मार्गावरून दररोज शेकडो वाहने, शालेय बस, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे खड्ड्यांमुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांनीही रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.
पी. एम. पाटील यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाला दोन दिवसांच्या आत रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना न केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
