‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सहभाग
आषाढी एकादशीनिमित्त शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांशी साधला संवाद; ‘घेऊन हाती मूठभर माती, करूया शेतीची वारी’ संकल्पनेला दिली कृतीची जोड
जळगाव | प्रतिनिधी
आषाढी एकादशीचे औचित्य साधून तिफन फाउंडेशनच्या वतीने आयोजित “शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी” या अभिनव उपक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “घेऊन हाती मूठभर माती, करूया शेतीची वारी” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत त्यांनी शेतशिवारात जाऊन माती हातात घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि अर्थव्यवस्थेचे अधिष्ठान असल्याचे सांगितले. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टाला समाजाने योग्य सन्मान दिला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.
आषाढी वारीच्या भक्तिमय परंपरेला कृषी संस्कृतीची जोड देणाऱ्या या उपक्रमातून शेती, माती आणि शेतकरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उपस्थित शेतकरी, कृषी अधिकारी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत शाश्वत शेती, कृषी जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक (नाशिक) सुभाष काटकर यांनी अभियानास शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी आणि उपसंचालक भरत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
