आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र मनुदेवी येथे भक्तीचा उत्सव; हजारो भाविकांना फराळ व फळांचे वाटप
मनुदेवी संस्थान व दुकान असोसिएशनचा उपक्रम; मुसळधार पावसानंतर मनुदेवी धबधबा सुरू, पर्यटकांसाठी आकर्षण
हर्षल पाटील | यावल (प्रतिनिधी)
खानदेशाची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी देवस्थान (आडगाव, ता. यावल) येथे आषाढी एकादशीचा उत्सव भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मनुदेवी संस्थान आणि मनुदेवी दुकान असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना फराळ, केळी आणि विविध फळांचे वाटप करण्यात आले.
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य तीर्थक्षेत्रावर पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. उपवास करणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्ट आणि दुकान असोसिएशनने फराळ व फळवाटपाचे नियोजन केले होते. या सेवाभावी उपक्रमाचे भाविकांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

मुसळधार पावसानंतर मनुदेवी धबधबा सुरू
सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर श्री मनुदेवी परिसरातील प्रसिद्ध धबधबा पुन्हा प्रवाहित झाला असून परिसर हिरवाईने नटला आहे. कोसळणारा धबधबा, निसर्गसौंदर्य आणि आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांचीही मोठी गर्दी होत आहे.
देवस्थान ट्रस्टने भाविक आणि पर्यटकांना पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी श्री क्षेत्र मनुदेवीला भेट देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, धबधब्याच्या परिसरात फिरताना आवश्यक ती सुरक्षितता बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती, सेवा आणि निसर्गसौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने श्री मनुदेवीचे दर्शन घेतले आणि परिसरातील रमणीय वातावरणाचा आनंद लुटला.
