आषाढी एकादशीनिमित्त नोबल इंटरनॅशनल स्कूलची भक्तिमय पायी दिंडी; वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन
विठ्ठलनामाच्या गजरात विद्यार्थ्यांची पायी वारी; संतांच्या वेशभूषेतून संस्कार, परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम
पाळधी | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नोबल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी यांच्या वतीने शाळेपासून श्री विठ्ठल मंदिरापर्यंत भव्य आणि भक्तिमय पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि अभंगांच्या भक्तिरसात रंगलेली ही वारी संपूर्ण गावासाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या चेअरमन डॉ. सौ. अर्चना सूर्यवंशी आणि डायरेक्टर प्रशांत सूर्यवंशी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आकर्षक फुलांनी सजविलेल्या पारंपरिक बैलगाडीतून विठ्ठल-रुक्मिणींच्या मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. भगवे ध्वज, भक्तिमय वातावरण आणि पारंपरिक सजावटीमुळे दिंडीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, माता रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई तसेच इतर संतांच्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “जय जय राम कृष्ण हरी” या जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला.
विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त, सामाजिक ऐक्य आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले. श्री विठ्ठल मंदिरात दर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी केळी, साबुदाणा खिचडी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रसंगी चेअरमन डॉ. सौ. अर्चना सूर्यवंशी, डायरेक्टर प्रशांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक भूषण चव्हाण, कोऑर्डिनेटर उज्वल पाटील, अकॅडमिक इन्चार्ज अंकुर कुलकर्णी, जोशी मॅडम, सर्व शिक्षकवृंद, वाहनचालक तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
भक्ती, संस्कार, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडविणाऱ्या या पायी वारीने विद्यार्थ्यांच्या मनात वारकरी संप्रदायाविषयी आदर, भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान आणि अध्यात्माची गोड ओढ निर्माण केली. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.
