“शहीदांचे बलिदान राष्ट्रप्रेम शिकवते, तर रक्तदात्याची निःस्वार्थ सेवा माणुसकी जपते” – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
कारगिल विजय दिनानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११५ रक्तदात्यांनी रक्तदान करून वीर जवानांना वाहिली कृतीतून आदरांजली
जळगाव / पाळधी | प्रतिनिधी, दि. २६ : कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ११५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून कारगिलच्या वीर शहीदांना कृतीतून अभिवादन केले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करत राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान, भारत विकास परिषद आणि माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले, “शहीदांचे बलिदान आपल्याला राष्ट्रप्रेम शिकवते, जवानांचे शौर्य धैर्याची प्रेरणा देते आणि रक्तदात्याची निःस्वार्थ सेवा माणुसकीचा खरा अर्थ सांगते. या मूल्यांचे जतन करणे, हाच कारगिल विजय दिन साजरा करण्यामागील खरा उद्देश आहे.”
ते पुढे म्हणाले की, “सीमेवर जवान राष्ट्ररक्षणासाठी रक्त सांडतो, तर रक्तदाता गरजूंना नवजीवन देतो. या दोन्ही सेवा राष्ट्रासाठी तितक्याच मोलाच्या आहेत.” त्यांनी जिल्ह्यातील २९ शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात येणाऱ्या शहीद स्मारकाच्या कामाला पुढील महिन्यात प्रारंभ होणार असल्याची माहिती देत, २९ ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कर्तव्यनिष्ठांचा गौरव
कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणारे पोलीस शिपाई गोरख पाटील आणि अनिल धनगर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच समाजसेवा, आरोग्यसेवा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. नीलिमा सेठिया, डॉ. सई नेमाडे, दर्शन जोशी आणि महेश दीक्षित यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रक्तदात्यांनाही प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
पोवाड्यांतून जागवला राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य भाव
कार्यक्रमात शाहीर संग्राम जोशी आणि शाहीर संदीप जोशी यांनी कारगिलच्या वीर जवानांच्या शौर्यगाथेवर तसेच रक्तदानाच्या महत्त्वावर आधारित ओजस्वी पोवाडा सादर केला. त्यांच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीचा उत्साह संचारला. लोककलेच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम आणि समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोमनाथ महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाहीर संदीप जोशी यांनी मानले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार राजू (मामा) भोळे, महापौर सौ. दीपमाला काळे, लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर संग्राम जोशी, सचिव शाहीर संदीप जोशी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने, प्रांताध्यक्ष विशाल चोरडिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
