आडगाव येथे २९ जुलैला ‘श्री गुरु पौर्णिमा महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन
बालविदुषी सुश्री जयाकिशोरी जी यांची कीर्तन सेवा; गुरुवर्य श्री देवगोपालजी महाराज शास्त्री व संत श्री बाबा महाहंस जी महाराज यांचे आशीर्वचन लाभणार
आडगाव (ता. यावल, जि. जळगाव) | प्रतिनिधी : मनुदेवी रोडवरील संत कुटिया, आडगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘श्री गुरु पौर्णिमा महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी परिपूर्ण असलेल्या या महोत्सवाला उत्तर महाराष्ट्रासह विविध भागांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाची सुरुवात सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत बालविदुषी सुश्री जयाकिशोरी जी यांच्या भक्तिमय कीर्तन सेवेद्वारे होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.०० ते १०.३० या वेळेत दीपप्रज्वलन व गुरु वंदन पूजनाचा कार्यक्रम होईल.
सकाळी १०.३० ते ११.०० या वेळेत मान्यवरांचे उद्बोधन तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यानंतर सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत परम पूजनीय गुरुवर्य श्री देवगोपालजी महाराज शास्त्री (श्री मोठेबाबाजी) यांचे आशीर्वचन होईल. तसेच दुपारी १२.०० ते १२.३० या वेळेत संत श्री बाबा महाहंस जी महाराज (लहान बाबाजी) यांचे समारोपीय प्रवचन आणि मार्गदर्शन होणार आहे.
महोत्सवाच्या समारोपानंतर दुपारी १२.३० ते ३.०० या वेळेत महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला असून, ही सेवा मुंजोबा भक्त ह.भ.प. श्री दीपक महाराज पाटील चिंचोलीकर यांच्या सौजन्याने भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आयोजकांनी जळगाव जिल्ह्यासह बाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा, तसेच नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
हा महोत्सव गुरुवर्य बाबाजी भक्त परिवार (उत्तर महाराष्ट्र-खान्देश) आणि संत कुटिया भक्त मंडळ, आडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
