देवीदास कॉलनीतील श्री शिवसाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय भजन सोहळा
विठ्ठलनामाच्या अखंड गजरात भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती; लोककल्याणासाठी प्रार्थना
शैलेश गुरव जळगाव ग्रामीण (प्रतिनिधी): आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव येथील देवीदास कॉलनीतील श्री शिवसाई मंदिरात भक्तिमय भजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्यात परिसरातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि बालभाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विठ्ठलभक्तीचा आनंद लुटला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व महापूजेने करण्यात आली. त्यानंतर स्थानिक भजनी मंडळांनी संतांच्या अभंगांचे सुमधुर सादरीकरण करत वातावरण भक्तिमय केले. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “घेऊनि गुरुजींचा हात, पंढरीची वाट धरू” या अभंगांनी आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
भक्तिरसात तल्लीन झालेल्या भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरत हरिनाम संकीर्तनात सहभागी होत विठ्ठलभक्तीचा आनंद अनुभवला. संपूर्ण मंदिर परिसर विठ्ठलमय वातावरणाने भारावून गेला होता.
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर उपस्थित भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी राज्याच्या, समाजाच्या आणि सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य, शांती आणि लोककल्याणासाठी सामूहिक प्रार्थना केली. धार्मिक परंपरा, वारकरी संस्कृती आणि सामूहिक भक्तीचा सुंदर संगम घडविणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
