‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी
२७-२८ जुलै रोजी दिल्लीत दोन दिवसीय अधिवेशन; पत्रकारांच्या हितासाठी ३० महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी अपेक्षित
ठाणे | प्रतिनिधी
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ जुलै रोजी नवी दिल्ली येथील विश्व युवक केंद्रात दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी देशभरातील पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, माध्यम तज्ज्ञ आणि विविध राज्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने दिल्लीकडे रवाना होत असून पत्रकारितेशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर राष्ट्रीय स्तरावर व्यापक मंथन होणार आहे.
अधिवेशनामध्ये भारतीय पत्रकारितेची सद्यस्थिती, बदलते माध्यमविश्व आणि पत्रकारितेचे भविष्य या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत विविध सत्रांमध्ये तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद, मुक्त संवाद आणि अनुभवकथनाद्वारे पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहाचा आढावा घेतला जाणार आहे.
पत्रकार संरक्षण कायद्याची आवश्यकता, वृत्तपत्र स्वातंत्र्य, माध्यमांची विश्वासार्हता, पत्रकारांचे सामाजिक व आर्थिक हक्क, डिजिटल पत्रकारितेतील संधी व आव्हाने, फेक न्यूजवर नियंत्रण, कौशल्य विकास, माध्यम नीतिमत्ता, पत्रकार कल्याण योजना आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रभाव अशा विविध विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात येणार आहे. तसेच विविध राज्यांतील यशस्वी उपक्रम आणि संघटनात्मक अनुभवांची देवाणघेवाण करून भविष्यातील कृती आराखडाही निश्चित केला जाणार आहे.
या राष्ट्रीय अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारांच्या हिताशी संबंधित ३० महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून ते भारत सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. पत्रकारांची सुरक्षा, सन्मान, सामाजिक संरक्षण, आर्थिक स्थैर्य आणि कामकाजाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी या ठरावांद्वारे विविध मागण्या मांडल्या जाणार आहेत. हे अधिवेशन निमंत्रित पदाधिकारी आणि पत्रकारांसाठीच आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी देशभरातील पदाधिकारी व पत्रकारांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या अधिवेशनातून पत्रकारांची एकजूट अधिक मजबूत होऊन भारतीय पत्रकारितेला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारांचा आवाज अधिक बुलंद होईल – अनिल म्हस्के
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे होणारे हे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांची सुरक्षा, प्रतिष्ठा, सामाजिक संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या परिषदेत मंजूर होणारे ठराव राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचवतील. भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात हे अधिवेशन महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी व्यक्त केला.
पत्रकार चळवळीला नवी दिशा मिळेल – विजय चोरडिया
‘व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र’चे प्रदेशाध्यक्ष आणि अधिवेशनाचे संयोजक विजय चोरडिया यांनी सांगितले की, दिल्लीतील हे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांच्या हितसंरक्षणासाठी, संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि भारतीय पत्रकारितेला नवी दिशा देण्यासाठी ऐतिहासिक ठरेल. या परिषदेमुळे केंद्र सरकारशी पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावी संवाद साधण्यासाठी भक्कम पाया निर्माण होईल. तसेच देशभरातील पत्रकारांमध्ये समन्वय, संघटनात्मक बळकटी आणि व्यावसायिक ऐक्य अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
